
शेतीतून उद्योजकतेकडे: ग्रामीण महिलेचा सोलर बिझनेस मॉडेल
एका भेटीत उघडला व्यवसायाचा नवीन दरवाजा, गृहिणी म्हणून शेतीची आणि संसाराची धावपळ सांभाळणाऱ्या योगिता सहाने यांनी सोलार ड्रायरच्या माध्यमातून मिळविली नवीन ओळख,आणि दाखवलं की एक योग्य निर्णय आयुष्य बदलू शकतो!
वयाच्या २१व्या वर्षी, २०१३ मध्ये, ओढा येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण सहाने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी आल्यानंतर त्यांनी स्वत:ला केवळ घरकामांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून शेतीची कामेही पाहू लागल्या. शेतातील काम मजूरांकडून करून घेण्यापासून ते इतर सर्व लहान-मोठ्या कामांमध्ये त्या पतीला मदत करत होत्या. त्यांचे कुटुंब सुखी आणि समाधानी होते, पण सर्व काही सुरळीत चालू असताना, कोरोना काळात त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशा प्रसंगात त्यांना शेतीला एका जोड धंद्याची नितांत गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवले. या गरजेतूनच त्यांच्या मनात काहीतरी नवीन करण्याचे बीज रूजले.
उत्तम शिक्षण असूनही, योगिता यांना नोकरी करण्याची इच्छा नव्हती. त्यांना शेतीशी संबंधितच काहीतरी करायचे होते, जेणेकरून शेतीत उत्पन्न वाढवता येईल. या विचारातून त्यांनी दूध व्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या पर्यायांचा विचार केला, पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. याच काळात, एकदा सह्याद्री फार्म्समध्ये आले असताना त्यांनी ‘सोलर ड्राईड प्रॉडक्ट्स’ पाहीले आणि त्यांना या व्यवसायाबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यांनी यावर अधिक माहिती घेतली. जाणकारांशी चर्चा केली आणि ‘सोलर ड्रायर’ बद्दल सखोल माहिती मिळवली. त्यांनी या व्यवसायाच्या सर्व बाजू तपासल्याा, आर्थिक गणित जुळवले आणि आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करत डिसेंबर २०२४ मध्ये स्वतःचा सोलर ड्रायर बसविला. हा सोलर ड्रायर बसविण्यासाठी त्यांना एकूण १२ लाख रुपये खर्च आला त्या साठी बँकेकडून त्यांनी ५ लाख कर्ज घेतले आणि केंद्र शासनाच्या पीएमएफएमई योजनेतून अनुदानही घेतले आहे.
सुरुवात मात्र सोपी नव्हती. पहिल्या प्रयत्नात त्यांनी टोमॅटो सुकवण्यासाठी टाकले, पण अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे त्यांचा ७० टक्के माल खराब झाला. या मोठ्या नुकसानीने खचून न जाता, योगिता यांनी या अनुभवातून शिकण्याचा निश्चय केला. सह्याद्री फार्म्स मध्ये त्यांनी १० दिवसीय सोलर ड्रायर व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान, जुन्या ड्रायर चालकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या निरीक्षणातून वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली चूक कुठे झाली हे शोधले आणि पुढील वेळी ती टाळण्यासाठी योग्य नियोजन केले. त्यांच्या या चिकाटीचे आणि मेहनतीचे फळ त्यांना लवकरच मिळाले.
आता त्या वातावरणाचा योग्य अंदाज घेऊन उत्कृष्ट दर्जाचा माल तयार करत आहेत. त्यांच्या बीकॉम या शिक्षणाचा उपयोग त्यांना व्यवसायाचा आर्थिक ताळेबंद सांभाळण्यासाठी होत आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. गेल्या केवळ पाच महिन्यांत, योगिता यांनी आपल्या सोलर ड्रायरच्या माध्यमातून आले, टोमॅटो, बेदाणा, पुदिना यांसारख्या विविध उत्पादनांचे तब्बल २९०४ किलो ड्रायिंग करून ५.३३ लाख रूपयांची उलाढाल केली आहे आणि यातून २.१५लाख रु.नफा देखील मिळाला आहे. त्याच बरोबर त्या बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परत फेड देखील करत आहेत.“ड्रायर व्यवसायात खूप संधी आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे,” असे त्या आत्मविश्वासाने म्हणतात. योगिता सहाने यांची ही कथा म्हणजे इच्छाशक्ती, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर एक सामान्य गृहिणी कशी यशस्वी उद्योजिका होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी हे सिद्ध केले आहे की, संकटांना संधी मानून आणि आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते.