
शेतीतून कंपनी संचालक पदापर्यंत... आणि आता गावची सरपंच!
द्राक्ष शेतीतून प्रवास सुरू करून, शेतकरी उत्पादक कंपनीत संचालक बनल्या आणि आज गावाच्या सरपंच पदी पोहोचल्या—ही आहे नाशिकच्या सोनेवाडी येथील संजीवनी पडोळ यांची प्रेरणादायी वाटचाल.
२००२ साली, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी संजीवनी सून म्हणून सोनेवाडीत आल्या. तेव्हा सासरी १४ एकर जमीन होती, पण त्यातील केवळ ३ एकर जमिनीवर द्राक्ष बाग होती आणि सिंचनाची सोयही मर्यादित होती. शेतीचा कोणताही अनुभव नसताना, त्यांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले. त्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनल्या आणि स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी वाहून घेतले. त्यांनी द्राक्ष शेतीतील प्रत्येक लहान-मोठे काम, अगदी छाटणीपासून ते औषध फवारणीपर्यंतचे, मनापासून शिकून घेतले. पती सोबत दिवस-रात्र शेतात राबून त्यांनी काबाडकष्ट करण्यास सुरुवात केली. दोघांच्या अथक मेहनतीने आणि अचूक नियोजनाने हळूहळू आर्थिक सुबत्ता येऊ लागली. यातून त्यांनी संपूर्ण १४ एकर शेतीत पाण्याची व्यवस्था केली आणि पाहता पाहता संपूर्ण जमीन हिरव्यागार द्राक्षबागेत रूपांतरित झाली.
२०१७ साली झालेल्या गारपिटीने त्यांच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले. डोळ्यादेखत मेहनतीवर पाणी फिरले होते, पण हे कुटुंब खचले नाही. उलट, नव्या जोमाने त्यांनी पुन्हा बाग उभी केली. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळली. याच काळात, आपल्या दोन्ही दीरांचे लग्न उच्च शिक्षित पण शेतीची आवड असलेल्या मुलींशी व्हावे, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांचे कुटुंब अधिक मजबूत झाले. त्यांच्या याच अथक मेहनतीच्या आणि एकतेच्या जोरावर कुटुंबाने २०२० साली अतिरिक्त २.५ एकर जमीन विकत घेऊन आपली प्रगती कायम ठेवली.
संजीवनी यांचे नेतृत्व गुण पाहून त्यांच्या कडे २०२१ साली स्थापन झालेल्या सह्याद्री सोनेवाडी फार्मर प्रोड्यूसर कंपनी या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक पद आले. या ठिकाणीही त्यांनी संधीचे सोने केले व महिला नेतृत्व असलेल्या या कंपनीत महिला शेतकरी जोडल्या आहेत. आज या कंपनीत ४३४ शेतकरी सभासद असून, त्यापैकी ७० टक्के महिला सभासद आहेत. या कंपनीच्या अध्यक्ष सुद्धा एक महिलाच आहे. स्थापनेच्याच वर्षी कंपनीचे १.३७ कोटी रुपये भाग भांडवल जमा झाले. या सोबतच गेल्या तीन वर्षात कंपनीची उलाढाल सुद्धा उत्तम असून पहिल्या वर्षी ४ कोटी दुसर्या वर्षी ५.५ कोटी तर तिसर्या वर्षी ६ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कंपनीने विंचूर एमआयडिसी मध्ये २ एकर क्षेत्र घेतले असून त्यात ते ५०० टन क्षमतेचे पॅक हाऊस उभारणार आहे. बदलत्या वातावरणाचा सामना करणार्यास सक्षम असणार्या द्राक्षाच्या नव्या व्हरायटीची लागवड करून शेती आणखी बळकट करण्याचा त्यांचा मानस आहे.
सन २०२१ साली सोनेवाडी गावाचे सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले. संजीवनी यांचे कुटुंबातील आणि शेतीतील व्यवस्थापन कौशल्य पाहून गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. सर्वांच्या पाठिंब्याने त्या बहुमताने लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या संजीवनी यांनी आता गावप्रमुख म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत अशी विकास कामे झाली आहेत, असे गावकरी अभिमानाने सांगतात. त्यात प्रामुख्याने घरोघरी पाणी,२०० कुटुंबांना घरकुल आणि २५ महिला बचत गटांच्या स्थापनेतून महिलांचे आर्थिक स्वावलंबन अशी कामे झाली आहेत.
वरील सर्व जबाबदार्या पेलत असताना त्यांनी कुटुंबाकडे आणि शेती कडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांचा मोठा मुलगा पंजाबमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, हे त्या अभिमानाने सांगतात. तसेच द्राक्ष शेतीतही त्यांचे उत्पन्नाचे आकडे सकारात्मक आहेत द्राक्ष निर्यातीतून २०२२ साली ५४.७१ टनातून २८.८७ लाख रुपये,२०२३ साली ५४.७१ टनातून १६.४०लाख, २०२४ साली २६.१० टनातून १६.९२ लाख. तर २०२५ साली द्राक्षाचे ४६.४० टनातून ४०.१७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. या उत्पादनामध्ये नव्या वाणांचा मोठा वाटा असून आरा-१५ आणि आरा-३६ यांनी उत्तम उत्पन्न दिले आहे. विशेष म्हणजे आरा-३६ या वाणाला १४० रुपये किलो असा चांगला दर मिळाला असल्याचे ते सांगतात.
एखादी स्त्री आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि नियोजन कौशल्याच्या जोरावर घर आणि गाव दोन्ही कशाप्रकारे सांभाळू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सरपंच संजीवनी ताई पडोळ. त्यांची ही कहाणी असंख्य महिलांसाठी आणि तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे.