
नोकरीला रामराम, स्वप्नांना सलाम!
स्थिर नोकरी, चांगला पगार आणि सुरक्षित भविष्य यापलीकडे जाऊन स्वत:ची स्वप्नं पूर्ण करायची धाडस फारच कमी जण करतात. पण सांगली जिल्ह्यातील स्नेहल हसबे यांनी लाखो रुपयांची आयटी कंपनीतील नोकरी सोडून ‘ज्यूस फार्म’ फ्रँचायझी सुरू केली आणि उद्योजकतेचा मार्ग निवडला. त्यांच्या या निर्णयाने केवळ त्यांचं जीवनच नव्हे, तर इतरांसाठीही प्रेरणादायी संधी निर्माण केली.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कदंबवाडी हे स्नेहल हसबे यांचे मूळ गाव. त्यांचे वडील सांगली जिल्हा सहकारी बँकेत नोकरीस होते, त्यामुळे त्यांचे शिक्षण शहरात झाले. पण सुट्टीत वडिलांसोबत शेतात जाणे, मातीची ओळख करून घेणे आणि कष्टाचे महत्त्व समजून घेणे, हे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झाले. शिक्षणात हुशार असलेल्या स्नेहल यांनी कॉम्प्युटर इंजीनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी भावाच्या आयटी कंपनीत काम केले आणि नंतर एका नामांकित कंपनीत सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून यशस्वीपणे काम पाहीले.
वयाच्या २४ व्या वर्षी, त्यांचा विवाह भिवगड येथील MSEB मध्ये वर्ग-१ अधिकारी असलेल्या देवदत्त हसबे यांच्यासोबत झाला. पतींनाही शेतीची आवड असल्याने त्यांनी वडिलोपार्जित द्राक्ष बाग जपून ठेवली होती. घर, नोकरी आणि कुटुंब - या सर्व जबाबदाऱ्या स्नेहल हसबे उत्तम रित्या सांभाळत होत्या. त्यांचे जीवन सुखी आणि स्थिर होते.
कोविड काळात वर्क फ्रॉम होम करताना त्यांच्या मनात काहीतरी नवीन करण्याची कल्पना अधिकच दृढ झाली. याच काळात, त्यांना ‘सह्याद्री ज्यूस फार्म’च्या एका इंस्टाग्राम जाहिरातीमुळे व्यवसायाची खरी प्रेरणा मिळाली. त्यांचे पती देवदत्त हसबे यांनी विटा येथील ज्यूस फार्मला भेट दिली व तेथे त्यांनी ज्यूस ची चव घेतली तेव्हा त्यांना समजले की फक्त गोड आणि थंड असणे म्हणजे ज्यूस नाही. मी आज चाखलेली चव सर्वांना चाखता यावी हा आशावाद घेऊन स्नेहल यांना व्यवसायाची नवी दिशा दाखवून गेला. त्यांना कळले की शेतीत पिकणाऱ्या फळांवर प्रक्रिया करून मूल्य वर्धन कसे करता येते. व त्या दरम्यान त्यांनी सह्याद्रीचा प्रवास सुद्धा समजून घेतला व शेती प्रती असलेले त्यांचे नकारात्मक मत बदलले व आता त्यांचे पती शेतीला जपतात म्हणून असलेली त्यांची नाराजी कायमची दूर झाली.
त्यानंतर त्यांनी या संधीचा सखोल अभ्यास केला. एकीकडे वार्षिक १० लाख रुपयांचे पॅकेज असलेली कॅप जेमिनी कंपनीतील नोकरी व दुसरी कडे कृषी पूरक व्यवसाय, यातून त्यांनी ज्यूस फार्म ची निवड केली. जून २०२५ मध्ये सहकारी रोहिणी बेल्हे यांच्या साथीने त्यांनी भागीदारीत ‘ज्यूस फार्म फ्रँचायजी’ सुरू केली. व्यवसाय सुरू केल्यावर अनेक लोकांनी त्यांना नोकरी सोडू नका, कारण व्यवसाय अनिश्चित असतो, असा सल्ला दिला. पण स्नेहल यांनी स्वतःच्या निर्णयावर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला. त्यांच्या ठाम भूमिकेप्रमाणे, "स्थिरतेसाठी नोकरी ठीक आहे, पण स्वप्नं पूर्ण करायची असतील तर उद्योग आवश्यक आहे." आणि याच विश्वासावर त्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला.
सुरुवातीच्या काळात फक्त तीन महिन्यांतच त्यांच्या उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि तब्बल साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न झाले. आज स्नेहल हसबे पूर्णवेळ व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांच्या पहिल्या फ्रँचायजी शॉपला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी सांगली शहरातच नुकतेच दूसरे प्रशस्त शॉप देखील सुरू केले आहे. त्या माध्यमातून आज एकूण ७ महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे केवळ त्यांनाच नाही, तर इतर महिलांनाही रोजगार मिळत आहे आणि त्यांना समाजासमोर येण्यासाठी एक व्यासपीठ मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी उच्च शिक्षण घेऊन शेती आणि शेतीपूरक पदार्थांना बाजरपेठेत पोचवण्यासाठी कार्य केल्यास नक्कीच शेतीला पुनर्वैभव प्राप्त होऊ शकते असे त्या सांगतात. स्नेहल हसबे यांनी नोकरीच्या चौकटीत न थांबता उद्योगाचा मार्ग निवडला आणि हे सिद्ध केले की, केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर इतरांसाठीही संधीचे नवे दरवाजे उघडता येतात. त्यांची ही कथा आजच्या तरुणाईला आणि महिलांना उद्योजकतेचा विचार करायला नक्कीच प्रोत्साहित करेल.