
.jpg)
पतीच्या निधनानंतर सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात...
आठवीपर्यंतच शिक्षण… पतीला गंभीर आजार, मग अकाली निधन… दोन मुलं, वृद्ध सासू-सासरे, आणि डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होणारी द्राक्षबाग. ही कहाणी इथंच थांबायला हवी होती—पण नाही! यापुढील चित्र उलट होतं कारण इथूनच सुरू झाली एक जिद्दी महिला शेतकरी शोभा गटकळ यांची नवी लढाई.
शोभा यांचा जन्म लासलगावच्या कोलटेक गावात झाला आणि त्यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झाले. २००८ साली, वयाच्या १९व्या वर्षी, त्यांचा विवाह मातेरवाडी येथील शरद गटकळ यांच्याशी झाला. सुरुवातीला सर्व काही सामान्य होते, पण २०१५ साली त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. पतीला फुफ्फुसाचा गंभीर आजार झाला. त्यांना घरीच ऑक्सिजन सिलिंडरवर ठेवावं लागलं. हे संकट अचानक आलं. शिक्षण कमी, शेतीतला कोणताही अनुभव नाही आणि पतीची काळजी, घरकाम आणि शेतीची जबाबदारी, अशा परिस्थितीत शोभा यांच्या समोर संकटाचा एक मोठा डोंगर उभा होता. सासू-सासरे वयोवृद्ध असल्याने फारशी मदत नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेत शेतीची कामे शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला शेतीची कोणतीही माहिती नसल्याने खूप अडचणी आल्या. औषधांची नावे वाचता येत नसतानाही, सुरवातीला रंगांवरून आणि चिन्हांवरून त्यांनी कीटकनाशके ओळखायला शिकले. प्रत्येक अडचण त्यांना काहीतरी नवीन शिकवून गेली. एका मागून एक संकटे येतच होती. शेतीत मदत करणारा गडी माणूस वारला, तरीही शोभा यांनी हार मानली नाही. त्या अधिक जिद्दीने कामाला लागल्या.
२०२१ साली पतीचे निधन झाले आणि त्यांच्या दु:खाला पारावार उरला नाही. आयुष्यातला सर्वात मोठा आधार हरपला. तरीही, त्यांनी काम थांबवले नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या सातव्या दिवशी त्यांनी द्राक्ष बागेची छाटणी केली आणि बाराव्या दिवशी पेस्ट लावली. दु:खाच्या प्रसंगातूनही त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांनी सांगीतले, "संकटांना टाळता येत नाही, त्यांना सामोरं जावं लागतं. काम करत राहिलं की ताकद मिळते." आज शोभा यांच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास पाहून असं वाटतं की, 'परिस्थितीने एवढं शिकवलंय की सर्व काही सोपं वाटायला लागलं.'
आज, शोभा यांनी २.५ एकर द्राक्षबाग स्वत:च्या हिंमतीवर सांभाळली आहे. त्यांनी ट्रॅक्टर चालवायला, द्राक्ष बागेची छाटणी करायला, औषध फवारणी करायला आणि पाण्याचे नियोजन करायला शिकल्या. सुरुवातीला लोकांकडून मिळालेली मदत आणि नंतर स्वत:च्या मेहनतीने त्यांनी शेतीत यश मिळवले. इयता ८ वी पास निराधार महिला हा शीक्का त्यांनी खोडून काढला असून आता त्या यशस्वी द्राक्ष निर्यातदार असल्याचे त्यांच्या शेती उत्पन्नातून दिसते. द्राक्षनिर्यातीतून २०२२ साली ८.४२ टनातून ५.२२ लाख,२०२३ साली १२.०५ टनातून ७.०५ लाख,२०२४ साली ७.४६ टनातून ४.९९ लाख तर २०२५ मध्ये ११.६३ टनातून ९.१७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले. या सोबतच स्थानिक बाजारपेठेतही त्यांनी द्राक्ष विक्री करून वेगळे उत्पन्न मिळविले आहे.
केवळ शेतीतच नव्हे, तर कुटुंबातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना दोन मुले आहेत, मोठा मुलगा ११वीत आणि दुसरा ७वीत शिकत आहे. दोन्ही मुलांचे शिक्षण आणि संगोपन करताना त्यांनी कधीही कामाची तक्रार केली नाही. आपल्या नियोजन आणि मेहनतीने त्यांनी कुटुंबाला सक्षम केले आणि शेतीतही यश मिळवले.आज त्या सह्याद्री फार्म्स च्या शेअर्स धारक आहेत. शोभा गटकळ यांची ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. त्या दाखवून देतात की, कोणत्याही कठीण परिस्थितीत, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवता येते. त्यांची गाथा हे सिद्ध करते की स्त्री कोणत्याही परिस्थितीत, केवळ घरच नाही तर शेती आणि समाजही सक्षमपणे सांभाळू शकते.