

एकेकाळी जिच्यासाठी माती अनोळखी होती… आज त्याच मातीतली द्राक्षबाग तिची ओळख बनली!
ज्या हातांनी कधी शेताची मातीही हातात घेतली नव्हती, आज त्याच हातांत ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आहे. शेतीचा कोणताही अनुभव नसलेल्या पूजा प्रवीण शिंदे यांनी पावणे दोन एकरावर द्राक्षबाग उभी केली. पहिल्याच वर्षी त्या बागेतून तब्बल ९ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. ही बाग आज त्यांच्या आत्मविश्वासाची ओळख बनली आहे.
सिन्नर तालुक्यातील सोनारी हे पूजा यांचं सासर. २००८ साली लग्न होऊन त्या शिंदे कुटुंबाच्या सून म्हणून घरात आल्या. पती कन्स्ट्रक्शन व्यवसायात असल्याने सुरुवातीची अनेक वर्षे नाशिक शहरातच गेली. त्यामुळे शेती, शेतातील कामाशी त्यांचा फारसा संबंध कधी आलाच नाही.
२०१७ मध्ये सासरे आर्मीतून निवृत्त झाले आणि कुटुंब पुन्हा सोनारी या मूळ गावी स्थायिक झाले. पुढे पतीला कामानिमित्त चार वर्षे पंढरपूरला राहावे लागले. आणि मग कोविडच्या काळात सासऱ्यांचे अचानक निधन झाले.
एका क्षणात सगळं बदललं. घराची जबाबदारी बदलली आणि त्यासोबत शेतीची जबाबदारीही पूजा यांच्या खांद्यावर आली.
ज्या कामाचा अनुभवच नव्हता, त्याच कामाची आता जबाबदारी स्वीकारायची होती. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा बदल ठरला. परिस्थितीसमोर थांबण्याऐवजी त्यांनी तिला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला.
त्या शेतात जाऊ लागल्या. प्रत्येक काम समजून घेऊ लागल्या. काय करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं, हे त्या प्रत्यक्ष कामातूनच शिकत गेल्या. वर्षभरात शेती त्यांच्या परिचयाची झाली आणि हळूहळू ती त्यांच्या आत्मविश्वासाचा भाग बनली.
शेती शिकताना त्यांनी स्वतःच्या मर्यादाही मोडल्या. ट्रॅक्टर चालवणं आणि पिकांवर फवारणी करणं त्यांनी स्वतः शिकून घेतलं. त्यामुळे शेतीतील महत्त्वाच्या कामांसाठी प्रत्येक वेळी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली. स्वतःच्या शेतात स्वतः निर्णय घेण्याचा आणि तो प्रत्यक्षात आणण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.
हा बदल फक्त शेतापुरता मर्यादित राहिला नाही. परिसरात दुचाकी चालवणाऱ्या महिला कमी असतानाही पूजा यांनी स्कूटी चालवायला सुरुवात केली. स्वतः शिकलेली गोष्ट इतर महिलांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची वृत्तीही याच काळात दिसून आली. आज गावातील एखाद्या महिलेला गाडी शिकायची असेल, तर पूजा आपली स्कूटी तिला आनंदाने मोफत शिकायला देतात. त्यांच्या बदलातून इतर महिलांमध्येही "आपणही करू शकतो" हा आत्मविश्वास निर्माण होऊ लागला.
शेतीची प्राथमिक कामे आत्मसात केल्यानंतर पूजा यांनी पुढचं पाऊल टाकलं: द्राक्षबाग. सह्याद्री फार्म्सच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पावणे दोन एकर क्षेत्रावर 'आरा ३६' या जातीच्या द्राक्षांची लागवड केली. बागेचे बारकावे त्यांनी केवळ ऐकून घेतले नाहीत, तर प्रत्यक्ष शेतात काम करत शिकल्या. मेहनत, सातत्य आणि शिकण्याची तयारी यांचं फळ पहिल्याच वर्षी मिळालं. पावणे दोन एकरातून तब्बल ९ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले.
पण या उत्पन्नाचा अर्थ केवळ एका वर्षाची आर्थिक कमाई एवढाच नव्हता. कधी शेतीची माहितीही नसलेली महिला स्वतःची बाग उभी करून त्यातून लाखो रुपयांचं उत्पादन घेऊ शकते, हा स्वतःवरचा विश्वास हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल होता. घरातील जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीपासून त्या शेतीतील निर्णय घेणाऱ्या आणि कुटुंबाच्या आर्थिक वाटचालीत सक्रिय योगदान देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या.
हा प्रवास त्यांनी एकटीने केला नाही. गावातील इतर महिलांची साथ घेऊन काम करण्याची पद्धत हा त्यांच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग ठरला. महिला एकत्र येऊन शेतातील कामे करू लागल्याने वेळ आणि मजुरीचा खर्च वाचू लागला. शेतीला जोड म्हणून त्यांनी दूध व्यवसायही सुरू केला, ज्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाला नियमित आर्थिक हातभार मिळू लागला.
आज पूजा यांच्या आयुष्याकडे पाहिलं, तर बदल स्पष्ट दिसतो. कधी शेतात पाऊलही न ठेवलेली महिला आज ट्रॅक्टर चालवते, फवारणी करते, स्वतःची द्राक्षबाग सांभाळते आणि डेअरी व्यवसायही पाहते.
पण या सगळ्यापेक्षा मोठा बदल त्यांच्या मनात झाला आहे. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्याऐवजी, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची ताकद आज त्यांच्यात निर्माण झाली आहे.
व्हिडिओ पहा: शेतीतल्या नवदुर्गा — पूजा शिंदे