
शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल!
व्यवसायाचा अनुभव नसतानाही, शुभांगी आणि विद्या यांनी स्वतःला सिद्ध केलं. अडचणींवर मात करत, त्यांनी केवळ व्यवसायात यश मिळवले नाही, तर १५ लाखांची उलाढाल केली. आज त्यांचा 'ज्यूस फार्म' यशस्वी उद्योजकतेचा उत्तम नमुना आहे.
शुभांगी यांनी बीई (मेकॅनिकल) ची पदवी घेतली आहे, तर विद्या यांनी फॅशन डिझाईनिंगचा डिप्लोमा केला आहे. दोघीही उच्चशिक्षित असूनही त्यांना व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यांच्या मार्गात सुरुवातीलाच अनेक अडथळे आले. लग्नानंतर सासर्यांना कॅन्सर झाल्यामुळे विद्या यांना डिझाइनचा छोटा व्यवसाय थांबवावा लागला. दुसरीकडे, शुभांगी यांना सुरवातीला नोकरी व नंतर लहान मुलांच्या जबाबदारीमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला नाही. त्या दोघेही तशा शेतकरी कुटुंबातील त्या मुळे शेतीपूरक काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते. दोघीही योग्य संधीच्या शोधात होत्या आणि अशा वेळी 'ज्यूस फार्म फ्रँचायजी ' सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर आला.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेण्यासाठी त्या पिंपळगाव बसवंत येथील ज्यूस फार्म येथे गेल्या. या प्रशिक्षणादरम्यानच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. दोघींसाठीही हा एक नवीन अनुभव होता, कारण मुलांना सोडून त्या पहिल्यांदाच बाहेर पडल्या होत्या. सुरुवातीला मुलांना एकटे सोडल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला, पण त्यांनी एकमेकींना धीर दिला. हा अनुभव त्यांच्यासाठी केवळ व्यावसायिकच नव्हे, तर वैयक्तिक कक्षा वाढीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. प्रशिक्षणा दरम्यान त्यांना समजले की आपण जेवढा विचार केलेला तितके हे काम कठीण नाही. हे सहज शिकून घेता येऊ शकते.
मे २०२४ मध्ये त्यांनी ओझर( नाशिक) येथे 'ज्यूस फार्म' या व्यवसायाची सुरुवात केली, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता पण महिन्यातच समोरच्या रस्त्याचे कामही सुरू झाले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यवसायाला मोठी खीळ बसली. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कामाचे काटेकोरपणे नियोजन केले, कामाची विभागणी केली आणि प्रत्येक समस्येवर शांतपणे मात केली. त्या संगतात की रस्त्याच्या कामामुळे ग्राहक आमच्या पर्यंत पोहचु शकत नव्हते मग आम्ही त्यांच्या पर्यंत पोचायला लागलो. त्या काळात लग्नाचे सीझन असल्याने त्या संबधित विविध कार्यक्रमांना त्यांनी आमरस पुरवायला सुरवात केली व ५०० लीटर आमरस विकला. या उपक्रमा मुळे जास्तीत जास्त लोकांना ज्यूस फार्म सोबत जोडता आल्याचे ते संगतता. तसेच या मेहनतीचे फलित म्हणून या वर्षी देखील अक्षय तृतीयेच्या काळात त्यांच्या आमरसाला खूप मागणी आली. त्या दोघीही झालेल्या चुका एकमेकींशी शेअर करतात आणि त्यातून नेहमी शिकत राहतात.
वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा परिणाम त्या ज्यूस फार्मवर होऊ देत नाहीत. हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, वाढदिवस साजरे करणे असे उपक्रम राबवून त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. यामुळे त्यांचा एक वेगळा ग्राहकवर्ग तयार झाला.ओझरजवळ एचएएल कंपनीच्या व एअर फोर्स च्या वसाहती असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला चांगली संधी मिळाली. देशाच्या विविध भागांतून येणारे लोक त्यांच्या ज्यूसचा आस्वाद घेऊ लागले. आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन केल्यामुळे ऑफ-सीझनमध्येही त्यांना आर्थिक ताण जाणवला नाही.
शुभांगी आणि विद्या सांगतात की, “कितीही गर्दी किंवा काम असले तरी त्यात मजा येते.” त्यांच्या मते, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि योग्य नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्यवसायामुळे त्यांचे संवाद कौशल्य कमालीचे सुधारले असून त्या मुळे व्यवसायही वाढत आहे असे त्या म्हणल्या. ज्यूस बनवण्याच्या सोप्या पद्धती(SOP),वेस्टेजचे शून्य प्रमाण आणि ग्राहकांना परवडणार्या किमतीत दर्जेदार आणि आरोग्यदायी ज्यूस देण्यातून मिळणारे समाधान, हा आम्हाला व्यवसायासाठी प्रेरणा देणारा मंत्र असल्याचे दोघी सांगतात. तसेच निमशहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना स्वत:चे घर संसार सांभाळून उद्योजक बनण्यासाठी हा व्यवसाय योग्य असल्याचे दोघींनी सिद्ध केले. आतापर्यंत त्यांच्या व्यवसायाची १५ लाख रूपयांची उलाढाल झाली असून, हे त्यांच्या मेहनतीचे आणि योग्य नियोजनाचे प्रतीक आहे.