
शेतीचा विस्तार, सोलार ड्रायरचं यश – शेतकरी व उद्योजिका!
फक्त १ एकरावरून सुरू झालेली शेती, आज २२ एकरांपर्यंत पोहोचली आहे. या प्रवासामागे आहे काटेकोर नियोजन, जोखीम घेण्याची तयारी आणि संकटातही हार न मानणारी जिद्द. ह्याच गुणांमुळे मालती बनकर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक व्यवसायाचं रूप दिलं. आता सोलार ड्रायरच्या माध्यमातून त्यांनी भाजीपाला आणि फळ प्रक्रिया उद्योगात एक नवीन संधी शोधली.
सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांमुळे मालती यांचा शेतीशी तसा संबंध नव्हता. पण, १९८६ साली अवघ्या १७ व्या वर्षी रमेश बनकर यांच्याशी विवाह झाल्यावर त्या नाशिक जवळील पिंपळगाव बसवंत या आपल्या सासरी आल्या. तेव्हा त्यांच्या वाट्याला फक्त एक एकर शेती होती. त्यांचे पती रमेश बनकर यांनी काही काळ नाशिक पीपल्स बँक आणि ग्राम पंचायत कार्यालयात नोकरी केली होती. सुरुवातीला शेतीतलं काहीच कळत नव्हतं. त्या सांगतात, "मी सुरुवातीला काहीच काम जमायचं नाही. पण जर मजूरांकडून काम करून घ्यायचं असेल तर आपल्यालाही सर्व आले पाहिजे या विचाराने मी आणखी बारकाईने काम शिकू लागले." पती, सासू आणि दीर अशा कुटुंबा सोबत त्यांनी शेतीच्या कामाला सुरवात केला आणि हळूहळू शेतीतले प्रत्येक काम शिकून घेतले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. दोन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणाची जबाबदारी, सासूबाईंच्या आजारपणात दहा वर्षे केलेली सेवा, आणि दिवसेंदिवस वाढणारी शेतीची कामं या सगळ्याची तारेवरची कसरत त्या लीलया करत होत्या. दरम्यान त्यांच्या पतीला आजार पणामुळे डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगीतला त्या वेळी मोठी बिकट परिस्थिती ओढवली मात्र या परिस्थीचा त्यांनी नेटाने सामना केला.एक हाती शेती सांभाळून कुटुंबाला या संकटातून बाहेर काढले. एक एकरपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज २१ एकरपर्यंत पोहोचला आहे. पण एक एकर पासून २१ एकर पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी आपल्या पती सोबत शेतात स्वत:ला झोकून दिले. काटेकोर आर्थिक नियोजन केले. अनेक वेळा अपयश पचवले. पण त्या नेटाने उभ्या राहिल्या. प्रत्येक वेळी नवीन शेत घेतलं की त्या टोमॅटो, कांदा किंवा गहू पिकवायच्या आणि त्यातून मिळालेल्या पैशातून द्राक्षाची बाग लावायच्या. त्यांची ही दूरदृष्टी आणि योग्य नियोजन त्यांच्या यशाचं गमक ठरलं. लहान दीराचं लग्न झाल्यावर जाऊबाईंनी घराची जबाबदारी स्वीकारली आणि मालती यांनी शेतीत पूर्ण वेळ लक्ष दिलं. त्यांच्या मेहनतीला मोठं यश आलं. कधीकाळी भाड्याच्या घरात राहणारे बनकर कुटुंब आज एका आलिशान बंगल्यात राहते. हा बंगला केवळ विटा-सिमेंटचा नाही, तर त्यांच्या घामाचं आणि कष्टाचं प्रतीक आहे. आज त्यांच्या मुलाने एमबीए केलं असून तो एका चांगल्या पदावर कार्यरत आहे, सूनही नोकरी करते. एक मुलगी प्राध्यापक आहे तर दुसरी अमेरिकेत स्वत:चा व्यवसाय सांभाळते. त्यांच्या जाऊबाईंचा एक मुलगा एमबीए करण्यासाठी बाहेर गेला आहे, तर दुसरा पदवीचे शिक्षण घेऊन शेतीत रमला आहे. खरं तर आता सर्व सुरळीत सुरू आहे आणि त्यांना शेतात काम करायचीही गरज नाही. पण, 'स्वत:चं काहीतरी वेगळं करावं' ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
शिक्षणाचा पुरेसा वापर न झाल्यामुळे मनात असलेली ही खंत त्या कधीच विसरल्या नव्हत्या. मागच्या वर्षी सोलर ड्रायरच्या माध्यमातून ती संधी चालून आली. त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये सोलर ड्रायर बसवला आणि अवघ्या चार महिन्यांत २२२८ किलो आले, टोमॅटो आणि बेदाणे यावर प्रक्रिया करून ३.९९ लाख रुपयांची उलाढाल केली. यातून त्यांना ९६ हजार रूपयांचा निव्वळ नफा मिळाला. फळे आणि भाजीपाल्याचे जास्त उत्पादन झाल्यास भाव पडतात याला पर्यायी व्यवस्था आणि शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी सोलार ड्रायर प्रकल्प चालू केल्याचे त्या सांगतात. या व्यवसायातही त्यांनी यशस्वी पदार्पण केले आहे.मालती आत्मविश्वासाने सांगतात की, योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास केवळ शेतीतच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपले कष्ट, ध्येय आणि समर्पण यांच्या बळावर यश मिळवून दाखवले आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम!